निम ग्रामपंचायतीत ५८ लाखांच्या कामांचा कथित घोटाळा? २०२४ ते २०२६ या तीन वर्षांचा हिशोब दप्तर विना गफल्यात!

खान्देश 24 न्यूज 

अमळनेर, प्रतिनिधी 

दोन ग्रामसेवक, सरपंचांसह संबंधितांच्या कारभारावर ग्रामस्थांचे गंभीर आरोप; दप्तर कुठे, कामांचा हिशेब कुठे?

 

निम (ता. अमळनेर) | खान्देश 24 न्यूज

निम ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांकडून एकापाठोपाठ एक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सन २०२४, २०२५ आणि २०२६ या तीन वर्षांतील ग्रामपंचायतीच्या कामकाजात नेमके काय घडले, याची चर्चा आता गावात रंगू लागली आहे.

ग्रामस्थांच्या आरोपानुसार, ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ५८ लाख रुपयांच्या कामांचा हिशेब संशयाच्या भोवऱ्यात असून, प्रत्यक्ष कामे, दाखवण्यात आलेली कामे, खर्चाची नोंद आणि संबंधित कागदपत्रे यांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

विशेष म्हणजे, या तीन वर्षांच्या कालावधीत दोन ग्रामसेवक कार्यरत असताना ग्रामपंचायतीच्या दप्तराच्या देखभालीबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. एका ग्रामसेवकाने रविवारी सुट्टीच्या दिवशी ग्रामपंचायतीचे दप्तर घरी नेल्याचा व्हिडिओ ग्रामस्थांकडे असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे दप्तराशिवाय घरपट्टीची लाखो रुपयांची वसुली झाल्याचाही ग्रामस्थांचा आरोप आहे.

५८ लाखांचा निधी नेमका कुठे खर्च झाला?

– कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर झाला?
– प्रत्यक्षात किती कामे पूर्ण झाली?
– कामांची बिले, मोजमाप पुस्तिका आणि खर्चाच्या नोंदी उपलब्ध आहेत का?
– दोन ग्रामसेवकांच्या कार्यकाळातील दप्तराची जबाबदारी नेमकी कोणाची?
– सरपंच आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनी या कामांवर देखरेख केली का?
– ग्रामस्थांना खर्चाचा आणि कामांचा तपशील का उपलब्ध करून दिला जात नाही?

प्रशासनाने चौकशी करावी, ही ग्रामस्थांची मागणी!

५८ लाखांच्या कामांची तांत्रिक तपासणी, आर्थिक लेखापरीक्षण आणि २०२४ ते २०२६ या कालावधीतील संपूर्ण ग्रामपंचायत दप्तराची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या प्रकरणात संबंधित ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत बाजू समोर येणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आरोपांची सत्यता अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होईल.

आता प्रश्न एकच — निम ग्रामपंचायतीच्या ५८ लाखांच्या कामांचा संपूर्ण हिशेब जनतेसमोर येणार का? की या प्रश्नांवरही पडदा टाकला जाणार?

खान्देश 24 न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील.

पुढील भागात ग्रामसेवक, ग्रामसदस्य,BDO यांच्या भूमिका बद्दल प्रश्न राहतील 

विशेष वृत्तमालिका — भाग ५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?