खान्देश 24 न्यूज
अमळनेर,प्रतिनिधी
नगरपालिकेच्या हद्दीत अतिक्रमण करून व्यवसाय; कारवाईची मागणी
अमळनेर : अमळनेर नगरपालिकेच्या हद्दीत शास्त्रीनगर परिसरात नगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडावर कथितरित्या अतिक्रमण करून गायीचा गोठा बनवून व्यवसाय सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत श्रीमती संघमित्रा शिरसाठ यांनी अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे ७ ऑगस्ट २०२६ रोजी लेखी निवेदन देऊन संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या अतिक्रमणामुळे आजू बाजूचा नागरिकांचा आरोग्याला बाधा निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच घरालगत गुरांचा गोठा बांधण्यात आल्याने परिसरातील नागरिकांसाठी मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून अस्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

संबंधित अतिक्रमणाची तातडीने पाहणी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणी निवेदकांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक, अमळनेर यांनाही देण्यात आल्या आहेत.

