लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! २३ वर्षीय प्रेम धनगरची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या; बोरनार गावात खळब
जळगाव | प्रतिनिधी खान्देश 24 न्यूज
जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसोहळ्याला गालबोट लावणारी अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. लग्नाच्या आनंदमय वातावरणात झालेल्या वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित संघर्षात झाले. या वादातून २३ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेम गोपाल धनगर (वय २३, मूळ रा. बोरनार, सध्या रा. अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लग्नसोहळ्यातील वादाचा रक्तरंजित शेवट!

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास प्रेम धनगर हा बोरनार येथे लग्नसोहळ्यासाठी गेला होता. यावेळी तेथे त्याचे काही व्यक्तींशी जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला शाब्दिक वादातून सुरू झालेल्या या संघर्षाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, अज्ञात हल्लेखोराने प्रेमवर धारदार चाकूने सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रेमचा जागीच मृत्यू झाला.
एमआयडीसी पोलिसांची घटनास्थळी धाव; तपासाला सुरुवात
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पाठविला. हल्लेखोर कोण होते? वाद नेमका कशावरून झाला? पूर्ववैमनस्य होते की लग्नसोहळ्यातील क्षुल्लक वादातून ही हत्या घडली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
मृत तरुण दोन दिवसांपूर्वीच गावी आला होता!
प्रेम धनगर हा सध्या अमळनेर येथे वास्तव्यास होता, तर त्याचे आई-वडील बोरनार येथे राहतात. तो दोन दिवसांपूर्वीच गावी आला होता. मात्र, लग्नसोहळ्यासाठी आलेल्या प्रेमचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चर्चा; हल्लेखोरांचा शोध सुरू
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रेम धनगर याच्याविरुद्ध यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्याचा या हत्येशी नेमका काय संबंध आहे, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे. घटनेबाबत गावातील नागरिकांकडून ठोस माहिती पुढे येत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.
लग्नसोहळ्यात तरुणाचा जीव जाण्याइतका वाद का पेटला? हल्लेखोरांना कोणाचे पाठबळ? आणि या हत्येमागचे नेमके कारण काय? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत. एमआयडीसी पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून, या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून हत्येमागील संपूर्ण सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी होत आहे.
खानदेश 24 न्यूज | जळगाव

