खान्देश 24 न्यूज
प्रतिनिधी
जानवे : अमळनेर तालुक्यातील मौजे जानवे येथे अंगणवाडी तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर मोठ्या प्रमाणावर घाण, साचलेले सांडपाणी आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, लहान बालकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अंगणवाडीत लहान बालकांची नियमित ये-जा असते. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरे उपचारासाठी आणली जातात. मात्र, या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणांसमोर सांडपाणी साचलेले असून परिसरात दुर्गंधी आणि चिखलाचे प्रमाण वाढले आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गावातील सार्वजनिक आणि शासकीय सुविधांच्या ठिकाणीच अशी अस्वच्छता दिसून येत असल्याने ग्रामपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित परिसराची नियमित स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा आणि कायमस्वरूपी गटार व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे!
ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन साचलेले सांडपाणी काढावे, परिसराची स्वच्छता करावी आणि पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
लहान बालकांच्या आरोग्याशी तसेच जनावरांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने आणखी किती दिवस दुर्लक्ष करायचे, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

