विवाहानंतर तिघांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न
पारोळा, खान्देश24 न्यूज तालुक्यातील वेल्हाणे येथे लग्नानंतर जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी दोन महिला आरोपींना धुळे जिल्ह्यातील निमगूळ गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर ताब्यात घेतले असून, संबंधित मध्यस्थ एजंटचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हाणे येथील वाल्मिक ताराचंद पाटील (वय ३२) याचा विवाह ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सुमन सुभाष सहाणी हिच्यासोबत झाला होता. या विवाहासाठी झारखंड किंवा छत्तीसगड येथून दोन आदिवासी समाजातील महिलांना मध्यस्थ एजंटमार्फत आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहाच्या व्यवहारात अडीच लाख रुपयांची बोली ठरल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या व्यवहाराची आणि संबंधित एजंटच्या भूमिकेची माहिती पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन फिर्यादी गणेश ताराचंद पाटील (वय ३४), त्यांचे वडील ताराचंद शांताराम पाटील आणि आई सरलाबाई यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधित महिला पैसे घेऊन निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विषबाधेमुळे त्रस्त झालेल्या फिर्यादीच्या आई-वडिलांना सध्या जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विवाहासाठी महिलांना आणणाऱ्या मध्यस्थ एजंटचा शोध पोलिसांकडून सुरू असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास सुरू असून, आरोपींवरील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे

