खान्देश 24न्यूज
पारोळा, अमळनेर, धरणगाव, चोपडा, एरंडोलसह जळगाव जिल्ह्यातील बसस्थानकांवर प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप; एसटी महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष का?
एसटी बसस्थानकांवरील कॅन्टीनमध्ये प्रवाशांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या निर्धारित विक्री किमतीपेक्षा जास्त दराने विकल्या जात असल्याची तक्रार समोर येत आहे.
१५ रुपये विक्री मूल्य असलेल्या पाण्याच्या बाटलीसाठी प्रवाशांकडून सर्रास २० रुपये आकारले जात असल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे, एसटी बसस्थानकांमध्ये कॅन्टीन चालविण्याचा ठेका घेतलेल्या व्यावसायिकांकडून प्रवाशांना योग्य दरात वस्तू उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना, जादा पैसे आकारले जात असतील तर हा प्रकार गंभीर आहे.
पारोळा, अमळनेर, धरणगाव, चोपडा, एरंडोल आदी बसस्थानकांवर हा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.
उन्हाळा असो किंवा प्रवासाची धावपळ, प्रवाशांना पाण्याची गरज असते. अशा वेळी पाण्याच्या बाटलीसाठी अतिरिक्त पाच रुपये मोजावे लागत असतील तर सर्वसामान्य प्रवाशांनी दाद मागायची कुणाकडे?
एसटी महामंडळ प्रशासनाने संबंधित कॅन्टीनच्या ठेक्याच्या अटी तपासून जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी. प्रत्येक कॅन्टीनमध्ये वस्तूंचे दरपत्रक लावणे आणि बिल देणे बंधनकारक करावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.
खान्देश 24 न्यूज

