वाळू माफियांच्या डंपरखाली अजून किती जन चिरडले जाणार मृत्यूचा खेळ कधी थांबणार? आणखी किती बळींची प्रशासन वाट पाहणार? भाग 1

खान्देश 24 न्यूज

 

अमळनेर | खान्देश 24 न्यूज

अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डंपरखाली चिरडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने नागाव बुद्रुक परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेमागे घातपात आहे का, असा गंभीर संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. अवैध वाळू वाहतुकीविरोधात आवाज उठविणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आह

नागाव बुद्रुक येथील कै. शरद रतन पाटील यांचा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री अंदाजे १०:३० वाजता HR 37 D 8957 क्रमांकाच्या डंपरखाली चिरडून मृत्यू झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर डंपर अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे

तक्रारीनंतर अवघ्या तीन दिवसांत डंपर खाली चिरडून  शेतकऱ्याचा मृत्यू!

या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे, निवेदनानुसार २८ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री. ज्ञानेश्वर काळूगीर गोसावी यांनी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अवैध वाळू वाहतुकीविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत शरद रतन पाटील यांचा डंपरखाली मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, मृत शरद रतन पाटील हे या प्रकरणातील साक्षीदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तक्रार आणि मृत्यू या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का? हा केवळ अपघात होता की यामागे काही वेगळे कारण आहे? असे प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

आता ग्रामस्थांचा प्रशासनाला थेट सवाल!
अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? रस्त्यावरून धावणाऱ्या डंपरच्या वेगावर आणि वाहतुकीच्या नियमांवर नियंत्रण कोण ठेवणार? नागरिकांच्या जीविताची सुरक्षा कोण करणार?

अवैध वाळू वाहतुकीविरोधात तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

आमदारांसह पोलीस व प्रशासनाला निवेदन; आंदोलनाचा इशारा!

या प्रकरणी श्री. ज्ञानेश्वर काळूगीर गोसावी व नागाव बुद्रुक येथील ग्रामस्थांनी आमदार अनिलदादा पाटील, अमळनेर पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय अधिकारी यांना संयुक्त निवेदन दिले आहे.
सदर मृत्यूच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करावी, संबंधित डंपरची तपासणी व आवश्यक कायदेशीर कारवाई करावी, तक्रारदार आणि साक्षीदारांना संरक्षण द्यावे, तसेच अवैध वाळू वाहतुकीला आळा घालावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने ४८ तासांच्या आत ठोस कारवाई न केल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे.
आता प्रश्न एकच…
वाळू वाहतुकीच्या नावाखाली रस्त्यांवर धावणाऱ्या डंपरच्या दहशतीला आळा कधी बसणार? एका शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर तरी प्रशासन जागे होणार का? आणि या मृत्यूमागील सत्य निष्पक्ष चौकशीतून कधी समोर येणार?

पुढील भागात :

अवैध वाळू वाहतुकीविरोधात तक्रार नेमकी कधी झाली? तक्रारीनंतर पोलिसांनी काय कारवाई केली? प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित होणारे गंभीर प्रश्न…

खान्देश 24 न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?