भुसावळ तालुक्यातील वरनगावात गोळीबार! २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हल्लेखोरांचा शोध सुरू

भुसावळ तालुक्यातील वरनगावात गोळीबार! २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हल्लेखोरांचा शोध सुरू

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील फुलगाव उड्डाणपुलाखाली आज रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास वरनगाव शहरात एका २३ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सरफराज मुक्ताईनगर हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या खांद्याला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे वरनगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कामानिमित्त वरनगावात आलेल्या तरुणावर हल्ला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सरफराज हा एका कंपनीत डंपर चालक म्हणून काम करतो. कामाच्या निमित्ताने तो वरनगाव परिसरात आला होता. याच दरम्यान अचानक त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून दुचाकीवरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. जखमी सरफराज याला तातडीने प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते.

गोळीबाराचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य किंवा अन्य काही कारणातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने गोळीबारामागील कारणाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

हल्लेखोरांचा शोध सुरू; पोलिसांकडून तपास

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळावरील परिस्थितीची पाहणी करून संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वरनगाव शहरात यापूर्वीही गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. त्यातच आता पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वरनगाव शहरात अचानक घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या घटनेचा पुढील तपास सुरू असून, हल्लेखोरांची ओळख आणि गोळीबारामागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.

खान्देश 24 न्यूज | भुसावळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?