एकनाथराव खडसेंच्या तक्रारीनंतर पोलिसांची सखोल चौकशी विमानतळ प्रशासनाच्या पडताळणीत प्राथमिक निष्कर्ष स्पष्ट

एकनाथराव खडसेंच्या तक्रारीनंतर पोलिसांची सखोल चौकशी
विमानतळ प्रशासनाच्या पडताळणीत प्राथमिक निष्कर्ष स्पष्
जळगाव : मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी केल्याच्या तक्रारीची जळगाव जिल्हा पोलिसांकडून सविस्तर चौकशी करण्यात आली. या प्रकरणात संबंधित दृश्यांची पडताळणी, विमानतळ प्रशासनाकडून प्राप्त माहिती आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या प्राथमिक तपासणीत संबंधित दृश्ये ड्रोनची नसून जळगाव विमानतळावरून उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमानाची असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी केल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित परिसरातील माहिती संकलित करून वस्तुस्थिती पडताळण्याची प्रक्रिया सुरू केली
दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन सदर यांनी खडसे यांची भेट घेतली होती. त्यानंतर २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ७.३० ते ८.१५ वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीकडून ड्रोनद्वारे रेकी किंवा चित्रिकरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, जळगाव विमानतळ प्रशासन तसेच संबंधित विमान प्रशिक्षण संस्थांशी संपर्क साधून माहिती मागवली. विमानतळ परिसरातील नोंदी, संबंधित अधिकाऱ्यांची माहिती आणि उपलब्ध चित्रण यांची पडताळणी करण्यात आली भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जळगाव विमानतळावर दोन फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून बालापूर आणि अमरावती परिसराच्या दिशेने नियमित प्रशिक्षण उड्डाणे केली जातात. उपलब्ध अभिलेखांनुसार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता जळगाव विमानतळावरून बालापूर परिसराच्या दिशेने प्रशिक्षण विमानाने उड्डाण केल्याची नोंद आहे.

या प्रकरणाच्या अनुषंगाने विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि संबंधित विमानतळ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तक्रारदारांनी उपलब्ध करून दिलेले संबंधित व्हिडिओही त्यांना दाखविण्यात आले. या दृश्यांतील वस्तू ड्रोन नसून जळगाव विमानतळावरून उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमानाची असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे
पोलिसांनी तक्रारीत नमूद केलेल्या परिसरात प्रत्यक्ष चौकशी केली. तसेच ‘प्लेन फाइंडर’ या अनुप्रयोगावरील विमान वाहतुकीच्या नोंदींची पडताळणी केली. या तपासणीत संबंधित वेळेच्या सुमारास परिसरातून विमान जात असल्याची माहिती उपलब्ध झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

प्राथमिक चौकशीत फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी केल्याचा संशय पुष्ट झालेला नसून, संबंधित दृश्ये प्रशिक्षण विमानाची असल्याचे निदर्शनास आले आहे. तक्रारीतील तारीख व वेळ, विमानतळ प्रशासनाकडून प्राप्त अधिकृत माहिती, संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली पडताळणी आणि ‘प्लेन फाइंडर’वरील नोंदी यांचा एकत्रित विचार करून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?