😡महापुरुषांच्या स्मारक परिसरात अस्वच्छता; नागरिकांमध्ये संताप
सोनखेडी, ता.अमळनेर. जि. जळगाव : सोनखेडी गावातील महापुरुषांच्या स्मारकाला लागून असलेल्या परिसरात गुरेढोरे बांधली जात असल्याने तसेच परिसरात घाण साचत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे स्मारकाची विटंबना होत असून, संबंधित प्रकार तातडीने थांबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्मारकाच्या परिसरात गुरेढोरे ये-जा करत असल्याने तेथे शेण व इतर घाण साचत आहे. त्यामुळे महापुरुषांच्या स्मारकाच्या पावित्र्याला बाधा पोहोचत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकाराला विरोध करणाऱ्या नागरिकांशी संबंधित व्यक्तीकडून दादागिरी केली जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महापुरुषांच्या स्मारकाचे संरक्षण व परिसराची स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे. स्मारक परिसरात गुरेढोरे बांधण्यास अथवा अस्वच्छता करण्यास प्रतिबंध करावा आणि नागरिकांच्या तक्रारीची योग्य ती चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी व चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

