खान्देश 24 न्यूज
अमळनेर : माणुसकी केवळ माणसांसाठीच नसते, तर मुक्या जीवांच्या वेदना समजून घेणाऱ्यांच्या कृतीतूनही ती दिसून येते. याचाच प्रत्यय अमळनेरमध्ये आला.
दिनांक १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.५० वाजेच्या सुमारास अमळनेर ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला रस्त्याच्या चेंबरमध्ये दोन कुत्र्याची पिल्ले अडकल्याचे पोलीस कर्मचारी सिद्धांत शिसोदे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेचच अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दूरध्वनीद्वारे माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या आदेशाने तसेच अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पिल्लांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले.
तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जेसीबीच्या साह्याने अखेर दोन्ही पिल्लांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आले. दोन मुक्या जीवांना नवजीवन मिळाल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या बचावकार्यात कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख, जफर पठाण, सत्यन संदानशिव, आकाश बाविस्कर आणि आकाश संदानशिव यांनी मोलाची कामगिरी बजावली.

