खान्देश 24 न्यूज, अमळनेर
प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील निम ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गेल्या काही काळापासून ग्रामस्थांकडून गंभीर तक्रारी केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीचे दप्तर, ग्रामसभा, घरपट्टी वसुली आणि तब्बल ५८ लाख रुपयांच्या विकासकामांच्या हिशेबाबाबत प्रश्न उपस्थित होत असताना आता पंचायत समिती प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर यांच्याकडे लेखी निवेदन देऊन ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, निम ग्रामपंचायतीत नियमाप्रमाणे सलग तीन ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती, विकासकामे आणि शासनाच्या विविध योजनांबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र लेखी निवेदन देऊनही अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
दुसरीकडे, ग्रामपंचायतीच्या २०२४, २०२५ आणि २०२६ मधील कारभाराबाबत प्रश्न विचारले असता एका संबंधित ग्रामसेवकाने आपण ग्रामपंचायतीचा चार्ज दुसऱ्याकडे दिला असल्याचे सांगितले. दुसऱ्या संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
मात्र चार्ज हस्तांतरित केला म्हणजे आधीच्या कालावधीतील आर्थिक आणि प्रशासकीय जबाबदारी संपते का?
५८ लाखांच्या कामांचा हिशेब कोण देणार? दप्तरातील नोंदी आणि घरपट्टी वसुलीचा तपशील कुठे आहे? असे प्रश्न अद्याप कायम आहेत.
आता BDO साहेबांना थेट सवाल!
लेखी निवेदन मिळाल्यानंतर चौकशी का झाली नाही?
तीन ग्रामसभा न झाल्याच्या तक्रारीची तपासणी झाली का?
५८ लाखांच्या विकासकामांचे प्रत्यक्ष आणि आर्थिक लेखापरीक्षण झाले का?
ग्रामपंचायतीच्या दप्तराचा ताबा आणि चार्ज हस्तांतरणाची पडताळणी झाली का?
घरपट्टी वसुलीच्या लाखो रुपयांचा हिशेब तपासण्यात आला का?
तक्रारदार ग्रामस्थांना चौकशीचा अहवाल का देण्यात आलेला नाही?
तक्रारी असूनही कारवाई होत नसेल, तर त्यामागचे कारण काय? प्रशासन कोणाला वाचवत आहे का? की चौकशीची प्रक्रिया सुरू आहे? याचा खुलासा BDO यांनी करणे गरजेचे आहे.
आता चौकशी होणार की पुन्हा आश्वासन?
निम ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांना केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष चौकशी आणि निष्पक्ष कारवाई हवी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व अभिलेख, बँक व्यवहार, घरपट्टी वसुली, विकासकामांची बिले आणि मोजमाप पुस्तिका तपासून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे.
निम ग्रामपंचायतीच्या प्रकरणात BDO स्वतः लक्ष घालणार का? की ग्रामस्थांना न्यायासाठी आणखी वरिष्ठ कार्यालयांचे दरवाजे ठोठवावे लागणार?
संबंधित ग्रामसेवक, सरपंच आणि गटविकास अधिकारी यांची बाजू मिळाल्यास तीही प्रसिद्ध केली जाईल.
खान्देश 24 न्यूज | सत्य | वेग | जनतेच्या हितासाठी

