शासकीय इमारतीच्या भिंतीवर खासगी जाहिरात फलक; नियमांचे उल्लंघन की प्रशासनाची मूकसंमती?
नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांच्याशी चर्चा होऊनही जाहिरात फलक कायम; शासकीय मालमत्तेच्या वापराबाबत उपस्थित झाले गंभीर प्रश्न!
अमळनेर | खानदेश 24 न्यूज
अमळनेर शहरातील शासकीय इमारतीच्या भिंतीवर खासगी जाहिरात फलक लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शासकीय मालमत्तेचा वापर खासगी जाहिरातींसाठी करणे योग्य आहे का? संबंधित जाहिरात फलक लावण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, या संदर्भात काल अमळनेरचे तहसीलदार सी. यू. पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. मात्र, चर्चा होऊनही संबंधित शासकीय इमारतीच्या भिंतीवर जाहिरात फलक अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेतली जात आहे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
शासकीय इमारतींच्या भिंती खासगी जाहिरातींसाठीच आहेत का?
शासकीय इमारती या सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या मालमत्ता आहेत. या इमारतींचा वापर सार्वजनिक कामकाजासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी होणे अपेक्षित आहे. मात्र, शासकीय इमारतींच्या भिंतीवर खासगी जाहिरातींचे फलक लावण्यात येत असल्याचे चित्र समोर आल्याने शासकीय मालमत्तेच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित जाहिरात फलक लावण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली आहे का? जाहिरात लावण्याबाबत काही नियम किंवा अटी निश्चित करण्यात आल्या आहेत का? तसेच शासकीय इमारतीच्या भिंतीवर जाहिरात लावण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे का? या बाबींची स्पष्टता होणे आवश्यक आहे.
नायब तहसीलदारांशी चर्चा, तरीही जाहिरात फलक कायम!
या प्रकरणाची माहिती नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांना देण्यात आली होती.

