चोपड्यात देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांची धाड!
चोपडा -प्रतिनिधी खान्देश 24 न्यूज
बाहेरील महिलांना आणले जात असल्याच्या चर्चा शहरालगत धनवाडी रस्त्यावरील एका शेतात सुरू असलेल्या अवैध देहविक्रीच्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. २७ ऑक्टोबर रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या
मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
धनवाडी रस्त्यावरील रस्त्यालगत असलेल्या शेतगट क्रमांक १२५ मधील पत्री शेडमध्ये अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एका महिलेला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देहविक्री करण्यास भाग पाडले जात असल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी शेतमालक जगन्नाथ तुळशीराम महाजन (वय ५६, रा. पाटील गढी) यांच्याविरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम १, २ व ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या शेतात ये-जा करणाऱ्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे अनेक वर्षांपासून बाहेरील महिलांना आणले जात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, महाविद्यालयीन तरुण-तरुणीही या ठिकाणी येत असल्याची चर्चा आहे. मात्र, या बाबींची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
चोपडा शहरात किंवा परिसरात कुठेही अवैध देहविक्रीचा व्यवसाय अथवा इतर अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दैनिक ‘लोकशाही’ला दिली. तसेच, अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी चोपडा पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
खान्देश 24 न्यूज चोपडा

