खान्देश 24 न्यूज
अमळनेर शहरातील धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ, नवीन शासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या रस्ता दुभाजकावरील लोखंडी जाळ्या अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. या तुटलेल्या जाळ्यांमधून विद्यार्थी आणि नागरिक बिनधास्तपणे रस्ता ओलांडत असल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
रस्ता दुभाजकावरील जाळ्या वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्या अनेक ठिकाणी तुटलेल्या असल्याने नागरिक थेट रस्त्यावरून ये-जा करत आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांना या ठिकाणी रस्ता ओलांडताना एखाद्या भरधाव वाहनाचा अंदाज न आल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
संबंधित यंत्रणेने या ठिकाणाची पाहणी करून तुटलेल्या जाळ्यांची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना संबंधित प्रशासन या समस्येकडे कधी लक्ष देणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
खान्देश 24 न्यूज — जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व्यासपीठ.

