खान्देश 24 न्यूज,अमळनेर
मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांतील आदिवासी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी आणि संभाव्य आंदोलन टाळण्यासाठी ४ डिसेंबरपूर्वी संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी हे पत्र पाठवण्यात आले आहे.
राज्यातील सुमारे १० जिल्ह्यांतील आदिवासी बांधवांमध्ये सध्या तीव्र अस्वस्थता आणि असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक व आदिवासी कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी निवेदन देऊन आदिवासींच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले होते. या निवेदनाची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
* अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात यावी.
* दुष्काळग्रस्त भागातील आदिवासी कुटुंबांना ‘खावटी’ अनुदानाचा लाभ मिळवून द्यावा.
* वन हक्क कायद्याची (Forest Rights Act) प्रभावी व जलद अंमलबजावणी करावी.
* पात्र पाडे आणि वस्त्यांना ‘महसूल गाव’ म्हणून दर्जा द्यावा, तसेच ‘अनुसूची ५’ (Schedule V) लागू करण्याबाबत कार्यवाही करावी.या प्रश्नांवरून आगामी काळात आंदोलनाची शक्यता लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल मंत्री, आदिवासी विकास मंत्री आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दि. ४ डिसेंबरपूर्वी संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी विनंती उपमुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे.

