शिरूड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिजिटल फ्लेक्सचे उत्साहात अनावरण!

खान्देश 24 न्यूज 

शिरूड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिजिटल फ्लेक्सचे उत्साहात अनावरण!

महापुरुषांचे विचारच देशात क्रांती घडवू शकतात – गौतम अनिल पाटील; भावी पिढ्यांना महामानवांच्या विचारांची प्रेरणा मिळावी या उद्देशाने स्तुत्य उपक्रम

अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथे बौद्ध वस्तीजवळ उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिजिटल फ्लेक्सचे अनावरण रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जयनील फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, तसेच तरुणांना महापुरुषांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गौतम पाटील यांचे गावात जल्लोषात स्वागत

गौतम अनिल पाटील यांचे शिरूड गावात आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने वाजतगाजत उत्साहात स्वागत करण्यात आले. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर पायी रॅली काढत ते बौद्ध वस्तीत आयोजित कार्यक्रमस्थळी दाखल झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिजिटल फ्लेक्सचे विधिवत अनावरण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

महापुरुषांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद – गौतम पाटील

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मनोगत व्यक्त करताना गौतम पाटील म्हणाले की, शिरूड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या नामकरण सोहळ्यासाठी मला निमंत्रित करून सन्मानित करण्यात आले, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विचारच देशात क्रांती घडवू शकतात. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात समता, बंधुता, न्याय आणि सामाजिक परिवर्तनाची भावना रुजविणे काळाची गरज आहे. महापुरुषांचे विचार केवळ प्रतिमांपुरते मर्यादित न राहता ते प्रत्येकाच्या आचरणात उतरले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

जयनील फाउंडेशन सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर

जयनील फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती देताना गौतम पाटील यांनी सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्ताची मदत, रुग्णालयीन उपचारांसाठी सहकार्य तसेच विविध आरोग्यविषयक अडचणी सोडविण्यासाठी संस्था नेहमीच तत्पर राहील. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठीही फाउंडेशन कटिबद्ध आहे.

समाजातील अधिकाधिक तरुणांनी फाउंडेशनशी जोडले जावे आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा. समाजहितासाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणांच्या पाठीशी संस्था खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

मान्यवरांनी केले उपक्रमाचे कौतुक

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर होते. यावेळी माजी सरपंच बापूराव महाजन, माजी पोलीस पाटील विश्वास महाजन, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. चंद्रकांत नेतकर, तालुकाध्यक्ष यशवंत बैसाणे, संघटक प्रमुख अरुण घोलप, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख जुबेर मेवाती, अल्पसंख्याक आघाडी संघटक साबीरभाई मेवाती, दिव्यांग आघाडी प्रमुख भटू बिहऱ्हाडे, माजी उपसरपंच भगवान सोनवणे, अतुल सोनवणे, सुनील पाटील, नंदू पाटील, संदीप भिला पाटील, विनोद सोनवणे आणि अंकित सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात डी. ए. धनगर यांनी महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत शिरूड येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरांनीही आपापली मनोगते व्यक्त करून या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

भीम जयंती आयोजन समितीचे विशेष परिश्रम

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरपीआयचे तालुकाध्यक्ष यशवंत बैसाणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सन २०२७ च्या भीम जयंतीचे अध्यक्ष रोशन बैसाणे, उपाध्यक्ष साहिल बैसाणे, उमेश बैसाणे, बाळासाहेब बैसाणे, बुद्धभूषण बैसाणे, रत्नदीप बैसाणे, नितीन बैसाणे, सिद्धार्थ बैसाणे, राहुल बैसाणे, आदित्य बैसाणे, अभिषेक वानखेडे, प्रशिककुमार बैसाणे, लोकेश मोरे, कृष्णा मोरे, निलेश बैसाणे, तुषार वाघ, दीपक सोनवणे, निखिल बाविस्कर, भाऊसाहेब बैसाणे, किरण बैसाणे, नंदलाल बैसाणे, रवींद्र बैसाणे, रतन बैसाणे आणि प्रवीण बैसाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण घोलप व प्रा. चंद्रकांत नेतकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अतुल सोनवणे यांनी मानले.

महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प

शिरूड येथे बाबासाहेबांच्या डिजिटल फ्लेक्सचे अनावरण हा केवळ एक कार्यक्रम नसून महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न ठरला. अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा, समता आणि बंधुतेची भावना अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

फोटो ओळ : अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील बौद्ध वस्तीत समाजमंदिराजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिजिटल फ्लेक्सचे अनावरण करताना जयनील फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व उपस्थित ग्रामस्थ.

खान्देश 24 न्यूज 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?