अमळनेरमध्ये अंबाऋषी टेकडीजवळ पुलाखाली आग; कचरा गाडी कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता!
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर पूर्णपणे नियंत्रण
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील अंबा ऋषी टेकडीजवळ चोपडा रोडवरील पुलाखाली आज दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आगीची घटना निदर्शनास येताच परिसरात उपस्थित असलेल्या कचरा गाडीवरील कर्मचाऱ्यांनी कोणतीही वेळ न दवडता आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत कर्मचाऱ्यांनी धाडसाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी रोहित वानखेडे, राज नाईक, चंद्रकिर्ती संदानशिव आणि राकेश संदानशिव यांनी प्रसंगावधान राखत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाचे कर्मचारी भिका संदानशिव यांनी तत्परतेने पुढाकार घेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून ती विझवली.

कचरा गाडी कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दल पोहोचेपर्यंत दाखवलेली तत्परता आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांच्या सतर्कतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यास मदत झाली.
दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी आगीचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. अशा घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने परिसरातील विद्युत यंत्रणेची तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
संकटाच्या प्रसंगी धावून येणारे हातच खऱ्या अर्थाने समाजाचे रक्षक असतात! कचरा गाडी कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खान्देश 24 न्यूज, अमळनेर

