अर्धवट माहितीच्या आधारे धार्मिक संघर्षाचा रंग देऊ नका; किनगाव घटनेची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणा, शमीमा पाटील यांची मागणी

किरीट सोमय्या, आधी वस्तुस्थिती समजून घ्या! किनगाव प्रकरणावर शमीमा पाटील आक्रमक

अर्धवट माहितीच्या आधारे धार्मिक संघर्षाचा रंग देऊ नका; किनगाव घटनेची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणा, शमीमा पाटील यांची मागण

यावल | प्रतिनिधी खान्देश 24 न्यूज 

यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनादरम्यान घडलेल्या कथित दगडफेकीच्या घटनेनंतर परिसरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २७ ऑक्टोबर रोजी किनगाव येथे भेट दिल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमीमा पाटील यांनी सोमय्या यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत, “किरीट सोमय्या यांनी आधी वस्तुस्थिती समजून घ्यावी, त्यानंतरच भाष्य करावे,” अशी आक्रमक भूमिका मांडली आहे.

शमीमा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या प्रकरणातील विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. अर्धवट माहितीच्या आधारे या घटनेला धार्मिक संघर्षाचे स्वरूप देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही घटनेची एकतर्फी माहिती घेऊन राजकीय वातावरण तापवण्याऐवजी उपलब्ध व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि पोलिसांच्या अधिकृत नोंदी यांच्या आधारे सत्य परिस्थिती समोर आणली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पथसंचलनादरम्यान नेमके काय घडले? निष्पक्ष चौकशीची मागणी

किनगाव खुर्द येथील पथसंचलनादरम्यान दगडफेक झाल्याची घटना समोर आल्यानंतर विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र या घटनेमागील नेमकी कारणे, संबंधितांची भूमिका आणि संपूर्ण घटनाक्रम यांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे शमीमा पाटील यांनी स्पष्ट केले.

पथसंचलनाचा मार्ग, परवानगी देण्याची प्रक्रिया, संभाव्य तणाव टाळण्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना आणि घटनेच्या वेळी नेमके काय घडले, या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तडवी आदिवासी तरुणांवरील कारवाईचा मुद्दा ऐरणीवर

या प्रकरणात तडवी आदिवासी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही शमीमा पाटील यांनी केला आहे. तसेच महिलांवर कथित लाठीचार्ज झाल्याच्या आरोपांचीही त्यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईची पारदर्शक तपासणी व्हावी. संबंधित व्हिडिओ चित्रफिती, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि अधिकृत पोलिस नोंदी तपासून दोषी कोण आहेत, हे निष्पक्षपणे निश्चित करावे. कोणत्याही निरपराध व्यक्तीवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

महापुरुषांच्या प्रतिमांच्या विटंबनेच्या आरोपांचीही चौकशी करा

पोलिस कारवाईदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान बिरसा मुंडा आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची विटंबना झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या गंभीर आरोपांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. संबंधित बाबींची उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, असे आवाहन शमीमा पाटील यांनी केले आहे.

सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या परंपरेला धार्मिक संघर्षाचे स्वरूप नको

किनगाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीच्या मिरवणुकीत हिंदू, मुस्लिम, तडवी, आदिवासी तसेच इतर समाजघटकांनी लोकवर्गणी देऊन सहभाग नोंदविल्याचा उल्लेख शमीमा पाटील यांनी केला आहे. या माध्यमातून परिसरातील सामाजिक ऐक्य आणि परस्पर सलोख्याची परंपरा अधोरेखित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अशा सामाजिक सलोख्याच्या वातावरणात एखाद्या घटनेचा वापर करून समाजात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे.

भाजपच्या जातीय-धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर टीका

भाजपच्या जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर टीका करताना शमीमा पाटील यांनी किरीट सोमय्या यांनी कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे म्हटले आहे.

किनगाव प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि निरपराध नागरिकांना न्याय मिळावा. तसेच परिसरातील सामाजिक शांतता व सलोखा कायम राहावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आता किनगाव प्रकरणात प्रशासनाच्या चौकशीतून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते आणि संबंधित आरोपांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

खान्देश 24 न्यूज नेटवर्क 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?