खान्देश 24 न्यूज नेटवर्क
सीजीपीचा तिरंगा यात्रेनी लक्ष वेधले!
कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरभदास, अशितोष राखा व अजिंक्य शिंदे यांना राजधानी नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर जाऊन तिरंगा फडकवला म्हणून त्यांच्या साथीदारांसह अटक करून त्यांना पाच दिवस तिहार जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांचा दोष काय, तर दिल्लीच्या जंतर-मंतर रोडवर प्रदर्शन करण्यास मनाई असताना त्यांनी तिरंगा फडकविला. म्हणून या तिघांना अटक करून पाच दिवसांसाठी तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले.त्या तिघांना अटक केल्यानंतर आंदोलनावर काही परिणाम होईल, असे सरकारला आणि केंद्र पोलिसांना वाटत असेल, तर ते साफ चुकीचे आहे. जेव्हा या तिघांना अटक करण्यात आली, त्यानंतर तितक्याच जोशाने तरुण पुढे चालून आले. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके हे त्यांच्या आजी वारल्यामुळे खेडेगावात गेले होते. ते आज नवी दिल्ली येथे पोहोचले आणि त्यांनी कॅनॉट प्लेसपासून तिरंगा यात्रा करण्याचे घोषित केले. आज सायंकाळी पाच वाजता कॅनॉट प्लेसवर या तिरंगा यात्रेला प्रारंभ होऊन ती यात्रा जंतर-मंतर रोडच्या दिशेने आगेकूच करेल. त्याआधी अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर तिरंगा यात्रेवर काही परिणाम होईल, असा समज पोलिसांचा होता. परंतु अटक होताच अभिजीत दीपके यांच्या समर्थनार्थ तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने कॅनॉट प्लेसवर पोहोचला. त्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबरच सर्व डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आणि तरुणांच्या संघटनांचा समावेश होता. त्यामुळे तिरंगा यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. हातात तिरंगा घेऊन सर्व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने जंतर-मंतर रोडने कूच करीत होते. जंतर-मंतरवर अभिजीत दीपके यांच्या समर्थनार्थ सर्व कार्यकर्ते झुंडीने तेथे पोहोचले. पोलिसांनी संपूर्ण जंतर-मंतरला बॅरिकेड्सच्या साह्याने कडेकोट बंदोबस्त केला होता. तेथे सर्व कार्यकर्ते व तरुण बॅरिकेड्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा पोलिसांच्या वतीने कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत होती. सर्व तरुणांना पकडून बसमध्ये बसवून पण वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर सोडून दिले जात होते. पोलिसांनी तरुण कार्यकर्त्यांचा अतोनात छळ केला, हे व्हिडिओमधून सर्वत्र दिसत होते. दिल्लीच्या जंतर-मंतरवर हे चालू असतानाच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यार्थ्यांचा जो छळ केला गेला, त्याचा निषेध केला. एका एनएसयूआय कार्यकर्त्या मुलीचा छळ केल्याने तिच्या कानाला ऐकू येत नाही, असे खुद्द त्या मुलीने आपली व्यथा परिषदेत कथन करून सांगितले. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी अभिजीत दीपके, सौरभदास, अशितोष राखा आणि अजिंक्य शिंदे यांना अटक करून पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्याबद्दल निषेध व्यक्त केला. आपले ध्येय एकच आहे, ते म्हणजे ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा. त्यासाठी आपण आंदोलन करीत आहोत. ते आंदोलनही एकच आहे, असे अभिजीत दीपके यांनी ट्विटद्वारे व्यक्त केले. तेव्हा अभिजीत दीपके यांनी दुसरे ट्विट करून राहुल गांधी यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
तिकडे दिल्लीत आम आदमी पार्टीच्या वतीने स्वतंत्रपणे तिरंगा रॅली काढून वेगळे प्रदर्शन करून त्यांनीही जंतर-मंतरवर जाण्याचा प्रयत्न केला. पण तेथे त्यांना पोलिसांनी मज्जाव केला. त्यानंतर नेहा बोरा, एडवोकेट प्रसिद्ध भूषण आणि इतर ज्येष्ठ नागरिक यांनी आपले प्रोटेस्ट करून स्वतःला अटक करून घेतली आहे. संपूर्ण दिल्लीमध्ये तीस ते पस्तीस हजार पोलिसांच्या माध्यमातून दिल्लीतील रस्त्यांवर गोंधळ घातला आहे. पोलिसांकडून प्रदर्शन करणाऱ्यांना मोठा त्रास दिला जात आहे. अधिकृतपणे लाठीमार किंवा अश्रुधुराचा वापर न करता पाण्याचा फवारा सोडून प्रदर्शन करणाऱ्यांना त्रास दिला जात आहे, हे मात्र तितकेच खरे आहे. जेवढा पोलिसांकडून प्रदर्शन करणाऱ्यांचा छळ होईल, तितक्याच जोमाने तरुण वर्ग पुढे येत आहे. हे आंदोलन थांबेल, असे सरकारला वाटत असेल, तर ते शक्य नाही. फक्त राजधानी नवी दिल्लीतच हे आंदोलन होत आहे, अशातला प्रकार नाही, तर संपूर्ण देशात हे आंदोलन पसरले आहे. सोलापूरमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात भव्य अशी रॅली काढण्यात आली. ती रॅली इतकी मोठी होती की, त्याला तोड नाही. महाराष्ट्रात पुणे येथे पोलिसांना लाजवेल अशा प्रकारे भव्य रॅली काढण्यात आली. इतक्या शांत पद्धतीने एवढ्या मोठ्या संख्येने पुण्यात रॅली निघाली. त्या रॅलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘ज्ञानेश कुमार मस्ट गो’ अशा पद्धतीने घोषणा दिल्या जात आहेत. पुणेकरांनी संपूर्ण रस्त्यांवरून हे प्रदर्शन केले. त्यामुळे पुणेकरांनी पुणेकरांसोबत संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली, यात संशय नाही. बाकी बिहारच्या पाटण्यात आंदोलन सुरूच आहे. पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाची धग कायम आहे. किंबहुना, सुरुवातीपेक्षा त्याची धग वाढली आहे, हे दिसून येत आहे.
खान्देश 24 न्यूज अमळनेर

