अमळनेर वनविभागाची अहोरात्र धडपड फळाला; अखेर ‘तो’ नरभक्षक बिबट्या जेरबंद, नागरिकांचा सुटकेचा निश्वास!

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर वनविभागाची अहोरात्र धडपड फळाला; अखेर ‘तो’ नरभक्षक बिबट्या जेरबंद, नागरिकांचा सुटकेचा निश्वास
* अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा व अचूक रणनीती यशस्वी; माजी नगरसेवक व सरपंचांचेही लाभले सहकार्य
अमळनेर (प्रतिनिधी):
गेल्या काही दिवसांपासून अंतुर्ली–रंजाणे परिसरासह संपूर्ण तालुक्यात दहशत माजवणाऱ्या आणि चार ते पाच पाळीव जनावरांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन राबवलेली अहोरात्र शोधमोहीम यशस्वी ठरली असून, १६ ऑक्टोबर रोजी पहाटे अंतुर्ली रस्त्यावरील कबरस्तान परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, वनविभागाच्या तत्पर व धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तालुक्यातील विविध भागांत होता वावर
गेल्या काही दिवसांत शिरूड, मंगरूळ, पिंपळे, ढेकू रस्ता, धार रस्ता, अंतुर्ली, रंजाणे, तांबेपुरा आणि टाकरखेडा शिवारात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत होता. बिबट्याने जनावरांवर हल्ले सुरू केल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिकारी-कर्मचाऱ्यांची रात्रीची गस्त व नियोजनबद्ध मोहीम
नागरिकांमधील दहशत दूर करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पावले उचलली. उपवनसंरक्षक राम धोत्रे, सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित व वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम आखण्यात आली. वनपाल गुलाब पिंजारी यांनी आपल्या पथकासह बिबट्याचा मागोवा घेत दररोज मध्यरात्री उशिरापर्यंत तसेच पहाटेच्या वेळी जीव धोक्यात घालून गस्त घातली. बिबट्याच्या पाऊलखुणा आणि हालचालींनुसार सातत्याने पिंजऱ्यांची ठिकाणे बदलण्यात येत होती. या मोहिमेत वनरक्षक दुर्गादास वानखेडे, योगेश पाटील, मनीषा मोरे तसेच वनमजूर प्रवीण पाटील, समाधान पाटील आणि मयूर पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.
लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य
या शोधमोहिमेदरम्यान बिबट्याला आकर्षित करण्यासाठी माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांनी पिंजऱ्यात ठेवण्यासाठी बकऱ्या उपलब्ध करून दिल्या, तर स्थानिक पातळीवर सरपंच सचिन पाटील यांनीही वनविभागाच्या पथकाला मोठे सहकार्य केले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या या उत्तम समन्वयामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली.
अखेर पहाटे पिंजऱ्यात अडकला
सतत जागा बदलणाऱ्या या बिबट्याला पकडण्यासाठी तांबेपुरा–अंतुर्ली रस्त्यावरील पिंजारी मुस्लिम कबरस्तानजवळ पिंजरा लावण्यात आला होता. १६ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या सावजाच्या शोधात आला आणि पिंजऱ्यात अलगद कैद झाला. बिबट्या पकडला गेल्याचे समजताच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला सुरक्षित अधिवासात सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. वनविभागाच्या या यशस्वी आणि धाडसी कारवाईबद्दल संपूर्ण तालुक्यातून पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?