खानदेश 24 न्यूज – विशेष वृत्त
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मुंबईसह नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि कलबुरगी मार्गावर १५ अनारक्षित विशेष गाड्या धावणार; जळगाव, भुसावळ, चाळीसगावच्या प्रवाशांना मोठा दिलासा!
४ ते ८ डिसेंबरदरम्यान विशेष रेल्वे सेवा; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या अनुयायांची प्रवासाची सोय होणार!
मुंबई | प्रतिनिधी :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी येथे जाणाऱ्या लाखो अनुयायांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे दिनांक ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत एकूण १५ अनारक्षित विशेष रेल्वे सेवा चालवणार आहे.
या विशेष गाड्यांमुळे नागपूर, अमरावती, कलबुरगी, कोल्हापूर आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे नागपूर-मुंबई मार्गावरील गाड्यांना अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रोड यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांनाही या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घेता येणार आहे.
नागपूर-मुंबईदरम्यान चार विशेष गाड्या
नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान चार विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहेत.
४ डिसेंबर २०२६ रोजी :
– गाडी क्रमांक 01260 नागपूर येथून सायंकाळी ६.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता मुंबईला पोहोचेल.
– गाडी क्रमांक 01262 नागपूर येथून रात्री ११.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.१५ वाजता मुंबईला पोहोचेल.
५ डिसेंबर २०२६ रोजी :
– गाडी क्रमांक 01264 नागपूर येथून सकाळी ७.४० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता मुंबईला पोहोचेल.
– गाडी क्रमांक 01266 नागपूर येथून सायंकाळी ६.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता मुंबईला पोहोचेल.
मुंबईहून नागपूरसाठी चार विशेष सेवा
मुंबईहून परतीच्या प्रवासासाठीही विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
६ डिसेंबर :
– गाडी क्रमांक 01249 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ८.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता नागपूरला पोहोचेल.
७ डिसेंबर :
– गाडी क्रमांक 01251 सकाळी १०.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.५५ वाजता नागपूरला पोहोचेल.
– गाडी क्रमांक 01255 दुपारी १२.३५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ३ वाजता नागपूरला पोहोचेल.
८ डिसेंबर :
– गाडी क्रमांक 01257 मध्यरात्री १२.२५ वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल.
या गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबे असतील.
दादर-नागपूर विशेष रेल्वेचीही सुविधा
७ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक 01253 दादर येथून मध्यरात्री १२.४० वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी ४.१० वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
या गाडीला कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी येथे थांबे असतील.
कलबुरगी-मुंबईदरम्यान दोन विशेष सेवा
कलबुरगी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानही दोन विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहेत.
– गाडी क्रमांक 01245 ही ५ डिसेंबर रोजी कलबुरगी येथून सायंकाळी ६.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता मुंबईला पोहोचेल.
– गाडी क्रमांक 01246 ही ७ डिसेंबर रोजी मुंबईहून मध्यरात्री १२.२५ वाजता सुटून त्याच दिवशी सकाळी ११.१० वाजता कलबुरगीला पोहोचेल.
या गाड्यांना दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, अक्कलकोट रोड आणि गाणगापूर रोड येथे थांबे असतील.
अमरावती-मुंबईदरम्यान दोन विशेष गाड्या
अमरावती आणि मुंबईदरम्यानही प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
– गाडी क्रमांक 01218 ही ५ डिसेंबर रोजी अमरावती येथून सायंकाळी ५.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२५ वाजता मुंबईला पोहोचेल.
– गाडी क्रमांक 01217 ही ७ डिसेंबर रोजी मुंबईहून मध्यरात्री १२.४० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १२.५० वाजता अमरावतीला पोहोचेल.
या गाड्यांना दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा येथे थांबे असतील.
कोल्हापूर-मुंबईदरम्यान दोन विशेष सेवा
कोल्हापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानही दोन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
– गाडी क्रमांक 01402 ही ५ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथून सायंकाळी ४.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता मुंबईला पोहोचेल.
– गाडी क्रमांक 01401 ही ६ डिसेंबर रोजी मुंबईहून रात्री १०.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर आणि हातकणंगले येथे थांबे असतील.
सामान्य तिकीट दराने प्रवासाची सुविधा
या विशेष रेल्वे गाड्या अनारक्षित स्वरूपात धावणार आहेत. प्रवाशांना सामान्य दराने यूटीएस प्रणालीद्वारे तिकिटे बुक करता येणार आहेत.
मुंबई-नागपूर विशेष गाड्यांना एकूण १८ आयसीएफ डबे असतील. त्यामध्ये द्वितीय शयनयान, सामान्य द्वितीय श्रेणी आणि चेअर कारचे मिळून १६ डबे, तसेच गार्ड्स ब्रेक व्हॅनसह द्वितीय आसनाचे दोन डबे असतील.
कलबुरगी-मुंबई विशेष गाड्यांना एकूण २४ आयसीएफ डबे असतील. तर अमरावती-मुंबई आणि कोल्हापूर-मुंबई विशेष गाड्यांना प्रत्येकी १८ आयसीएफ डबे असतील.
वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती कुठे मिळणार?
प्रवाशांनी विशेष गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक, थांबे आणि इतर माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून हे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी जाणाऱ्या अनुयायांची संख्या मोठी असते. अशा वेळी मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध होणार असून, विशेषतः जळगाव, भुसावळ आणि चाळीसगाव परिसरातील प्रवाशांना मुंबई प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
खानदेश 24 न्यूज | जनहितार्थ, निर्भीड आणि विश्वासार्ह बातमीसेवा

