खान्देश 24 न्यूज | विशेष वृत्त
दहिवद-पातोंडा शिवारात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ! ३० ते ३५ शेतकऱ्यांच्या केबल वायर चोरीला; वारंवार नुकसान सोसून शेतकरी हतबल!
नवीन केबल टाकूनही चोरट्यांचा पुन्हा डल्ला; प्रशासनाच्या केवळ समजुतीने प्रश्न सुटणार कधी? संतप्त शेतकरी रास्ता रोको आंदोलनाच्या तयारीत, पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देणार!
दहिवद-पातोंडा प्रतिनिधी |
अमळनेर तालुक्यातील दहिवद-पातोंडा शिवारात शेतकऱ्यांच्या केबल वायर चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. यापूर्वी केबल वायर चोरीला गेल्यानंतर आर्थिक भुर्दंड सहन करून शेतकऱ्यांनी नव्याने केबल वायर खरेदी करून टाकल्या होत्या. मात्र, चोरट्यांनी पुन्हा एकदा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेतातील केबल वायरवर डल्ला मारल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिवद-पातोंडा शिवारातील तब्बल ३० ते ३५ शेतकऱ्यांच्या केबल वायर चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना वारंवार केबल खरेदी करण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. एकदा चोरी झाली तर पुन्हा नवीन केबल टाकायची आणि काही दिवसांत चोरट्यांनी तीच केबल चोरून न्यायची, असा प्रकार सुरू असल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत.
प्रशासन येते, समजूत काढते; मात्र चोरी थांबवणार कोण?
केबल चोरीच्या घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांची समजूत काढली जाते. मात्र, प्रत्यक्षात चोरीच्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
रात्रीच्या वेळी चोरटे शेतशिवारात येऊन केबल वायर कापून नेत असताना स्थानिक पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे? शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? वारंवार तक्रारी करूनही या घटनांना आळा बसत नसेल तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे? असे संतप्त सवाल उपस्थित होत आहेत.
शेतकऱ्यांचा संयम सुटला; रास्ता रोको आंदोलनाचा इशारा!
वारंवार होणाऱ्या केबल चोरीमुळे आर्थिक नुकसान सहन करणे आता अशक्य झाल्याने दहिवद-पातोंडा परिसरातील संतप्त शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांना निवेदन देण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा, चोरीला गेलेल्या केबल वायर परत मिळवून द्याव्यात आणि शेतशिवारात रात्रीची गस्त वाढवावी, अशी त्यांची मागणी आहे.
प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शवली आहे.
आता तरी प्रशासन जागे होणार का?
शेतकऱ्यांसाठी वीज आणि पाणी ही शेतीची जीवनवाहिनी आहे. केबल वायर चोरीला गेल्यामुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही, तर पिकांना पाणी देण्याचे नियोजनही कोलमडते. नवीन केबल खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करायचा आणि पुन्हा तीच चोरीला जाणार असेल तर शेती करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
३० ते ३५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात असताना प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपास करणे आवश्यक आहे. केवळ घटनास्थळी भेट देऊन समजूत काढण्यापेक्षा चोरट्यांना पकडून चोरीच्या घटनांना कायमचा आळा घालण्यासाठी ठोस कारवाई होणार का, याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे
खान्देश 24 न्यूजचा सवाल : शेतकऱ्यांच्या शेतातील केबल सुरक्षित नसेल, तर त्यांच्या शेतीचे संरक्षण कोण करणार?

