शासकीय कामासाठी १५ हजारांची लाच! एसीबीचा तळोदा प्रकल्प कार्यालयावर धडाका; वरिष्ठ लिपिकासह दोन लोकसेवक रंगेहात जाळ्यात!

🚨 खान्देश 24 न्यूज | नंदुरबार

 

शासकीय कामासाठी १५ हजारांची लाच! एसीबीचा तळोदा प्रकल्प कार्यालयावर धडाका; वरिष्ठ लिपिकासह दोन लोकसेवक रंगेहात जाळ्यात!

 

वेतन निश्चितीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी लाचेची मागणी; लाचेची रक्कम एकाकडून दुसऱ्याकडे जाताच एसीबीने दोघांनाही पकडले!

 

नंदुरबार | प्रतिनिधी खान्देश 24 न्यूज| दि. २३ नोव्हेंबर २०२६

 

शासकीय कार्यालयात काम करून घेण्यासाठी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी करणाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जोरदार दणका दिला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी संबंधित प्रकरणात तब्बल १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन लोकसेवकांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

नेमके प्रकरण काय?

 

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथून नंदुरबार जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत बदली झालेल्या ३१ वर्षीय कर्मचाऱ्याचे सुधारित वेतन निश्चित करून त्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यासाठी आरोपी क्रमांक एक याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

 

शासकीय कामासाठी लाच मागितली जात असल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार यांच्याकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

 

एसीबीचा सापळा अन् दोघेही जाळ्यात!

 

तक्रारीची गांभीर्याने दखल घेत एसीबीच्या पथकाने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

 

त्यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनपूर्वक सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर आरोपी क्रमांक एक याने ती रक्कम आरोपी क्रमांक दोन याच्याकडे दिली. याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत दोघांनाही लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले.

 

कोण आहेत पकडलेले दोघे?

 

या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

 

1. सतपालसिंग केसरीसिंग वळवी (वय ४७) – वरिष्ठ लिपिक.

2. दुर्गाप्रसिंग महेशसिंग पावडी (वय ४२) – रोजंदारी कामगार.

 

तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

 

या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

 

एसीबीच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

 

ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा चंद्रकांत अवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक प्रशांत भुरटे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

 

नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

नागरिकांना एसीबीचे आवाहन

 

शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा आणि भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्याचे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

१५ हजारांच्या लाचेसाठी दोन लोकसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने तळोदा परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्यांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

 

खान्देश 24 न्यूज – निर्भीड, निष्पक्ष आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?