पातोंडा, कळमसरे आणि अमळनेर शहरात खळबळ; विवाहित महिला व तीन मुलांनाही पळवून नेल्याची तक्रार, विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

खान्देश 24 News.Com

अमळनेर तालुक्यात तीन दिवसांत आठ जणांचे अपहरण; पाच तरुणींसह तीन चिमुकल्यांचा समावेश!

पातोंडा, कळमसरे आणि अमळनेर शहरात खळबळ; विवाहित महिला व तीन मुलांनाही पळवून नेल्याची तक्रार, विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यात गेल्या तीन दिवसांत अपहरणाच्या एकापाठोपाठ एक घटना समोर आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत पाच तरुण महिला आणि तीन लहान मुलांसह एकूण आठ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. यामध्ये अमळनेर शहरातील पाठक गल्ली, पातोंडा, जिनगर गल्ली आणि कळमसरे येथील घटनांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित पोलीस पथकांकडून तपास सुरू आहे.

विप्रो कंपनीजवळून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता

अमळनेर शहरातील पाठक गल्ली परिसरातील १९ वर्षीय तरुणी विप्रो कंपनीत कामाला होती. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास ती कंपनीजवळून बेपत्ता झाल्याची घटना घडली. बराच वेळ होऊनही मुलगी घरी परत न आल्याने तिच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.

पातोंडा येथे तरुणी आणि तिची मावशी बेपत्ता

तालुक्यातील पातोंडा येथे १९ नोव्हेंबर रोजी दोन महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. गावातील २३ वर्षीय तरुणी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दुकानातून सामान आणण्यासाठी घराबाहेर पडली; मात्र ती परतलीच नाही.

त्याच दिवशी तिच्या शेजारी राहणारी २२ वर्षीय तरुणीची मावशीदेखील घरात आई आणि भाऊ नसताना बेपत्ता झाली. सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर दोघीही घरी नसल्याचे लक्षात आले. शोधाशोध केली असता गावातील दोन तरुणांनी त्यांना पळवून नेल्याची माहिती मिळाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दोन तरुणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

जिनगर गल्लीतून विवाहित महिलेसह तीन चिमुकली मुले बेपत्ता

अमळनेर शहरातील जिनगर गल्ली परिसरात २० नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता २४ वर्षीय विवाहित महिला आपल्या तीन लहान मुलांसह बेपत्ता झाल्याची घटना घडली. बेपत्ता महिलेच्या मुलांमध्ये चार वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांची दोन मुले यांचा समावेश आहे.

पत्नी आणि मुले घरी परत न आल्याने पतीने पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल अरुण राठोड करीत आहेत.

कळमसरे येथून २८ वर्षीय तरुणीला पळवून नेल्याची तक्रार

तालुक्यातील कळमसरे येथेही २१ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे पाच वाजेच्या सुमारास २८ वर्षीय तरुणीला तिच्या राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार दाखल झाली आहे. तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद साळी करीत आहेत.

तीन दिवसांत आठ जण बेपत्ता; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

अमळनेर शहरासह ग्रामीण भागात अल्पावधीत घडलेल्या या घटनांमुळे महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे एका घटनेत विवाहित महिलेसह तीन लहान मुले बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

या सर्व प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू असून बेपत्ता महिला आणि मुलांचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. या घटनांमागील नेमके कारण काय, संबंधित व्यक्ती स्वेच्छेने गेल्या आहेत की त्यांना जबरदस्तीने नेण्यात आले, याबाबत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.

पोलिसांनी या सर्व प्रकरणांचा गांभीर्याने तपास करून बेपत्ता महिला आणि चिमुकल्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

खान्देश 24 न्यूज | अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करायचा प्रयत्न केलात?