निम शिवारात हिंस्र वन्यप्राण्याचा धुमाकूळ! गोशाळेतील तीन वर्षीय वासराचा फडशा; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्याचा हल्ला नसल्याचा वनविभागाचा प्राथमिक निष्कर्ष; ठशांच्या आधारे ‘तळस’ या हिंस्र प्राण्याचा वावर असल्याची माहिती – वनपाल गुलाब पिंजारी यांचे स्पष्टीकरण
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील निम शिवारात एका हिंस्र वन्यप्राण्याने गोशाळेच्या आवारात घुसून तीन वर्षीय वासरावर हल्ला करत त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमळनेर येथील डॉ. संदीप जोशी यांच्या मालकीच्या शेतात सुरू असलेल्या गोशाळेच्या परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निम गावातील शेतकरी सुदाम पाटील हे डॉ. संदीप जोशी यांच्या शेतातील कामकाज पाहतात. दरम्यान, गोशाळेच्या आवारात बांधलेल्या तीन वर्षीय वासरावर रात्रीच्या सुमारास अज्ञात हिंस्र वन्यप्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सुदाम पाटील कामाच्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना वासरू मृतावस्थेत आढळून आले. ही घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने अमळनेर वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
बिबट्या नसून ‘तळस’ प्राण्याचा हल्ला असल्याची वनविभागाची माहिती!
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने परिसराची पाहणी केली. याबाबत वनपाल गुलाब पिंजारी यांनी माहिती देताना सांगितले की, वासरावर हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून ‘तळस’ हा हिंस्र वन्यप्राणी असल्याचे ठशांच्या आधारे स्पष्ट होत आहे. त्यामुळे परिसरात बिबट्या असल्याच्या चर्चांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी!
शिवारात घडलेल्या या घटनेमुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात जाताना किंवा शेतातून घरी परतताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. एकट्याने अंधारात जाणे टाळावे तसेच जनावरांच्या गोठ्यांची सुरक्षितता तपासावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार बिबट्याचा वावर असल्याची कोणतीही पुष्टी झालेली नसून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.
वनविभागाने परिसरात लक्ष ठेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे!
निम शिवारातील या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाने नियमित गस्त घालावी, वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि पशुधनाच्या सुरक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आणि मानवी वस्ती यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी प्रशासनानेही पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
खान्देश 24 न्यूज | अमळनेर

